परवेझ मुशर्रफ

परवेझ मुशर्रफ (उर्दू: پرویز مشرف; जन्म: ११ ऑगस्ट १९४३) हा एक निवृत्त पाकिस्तानी लष्करी अधिकारी (जनरल), पाकिस्तानचा माजी लष्करप्रमुख व राष्ट्राध्यक्ष आहे.

१९९९ साली पाकिस्तानचा लष्करप्रमुख असताना मुशर्रफच्या सैन्याला कारगील युद्धामध्ये भारताकडून पराभूत व्हावे लागले. ह्यावरून मुशर्रफ व तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ ह्यांच्या दरम्यान पराकोटीचे मतभेद निर्माण झाले होते. १२ ऑक्टोबर १९९९ रोजी नवाझ शरीफने मुशर्रफला लष्करप्रमुख पदावरून काढल्याचे वृत्त कळताच मुशर्रफने नवाझ शरीफ विरुद्ध लष्करी बंड पुकारले व देशाची सत्ता हातात घेतली. १५ ऑक्टोबर १९९९ रोजी मुशर्रफने पाकिस्तानचे संविधान निलंबित केले, देशामध्ये आणीबाणी जाहीर केली व स्वत:ला पाकिस्तानच्या राष्ट्रप्रमुखपदावर नियुक्त केले. त्याने नवाझ शरीफला अटकेत टाकून नंतर देश सोडण्यास भाग पाडले.

२००१ साली घेण्यात आलेल्या एका बनावटी जनमतामध्ये विजय मिळवून मुशर्रफ अधिकृतपणे पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष बनला. २००७ सालापर्यंत पाकिस्तानमधील जनतेचे मत त्याच्याबद्दल प्रतिकूल बनले होते. डिसेंबर २००७ मध्ये बेनझीर भुट्टोची हत्या झाल्यानंतर अखेर १८ ऑगस्ट २००८ रोजी मुशर्रफने राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला व लंडनकडे पळ काढला. पुढील ४ वर्षे लंडनमध्ये राहिल्यानंतर २४ मार्च २०१३ रोजी तो पाकिस्तानात परतला. तालिबान ह्या अतिरेकी संघटनेने मुशर्रला ठार मारण्याची धमकी दिली होती. पाकिस्तानात परतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्याला अटक करून त्याच्यावर देशद्रोह, खून इत्यादी आरोपांवरून खटला भरला.

परवेझ मुशर्रफ
परवेझ मुशर्रफ


पाकिस्तान ध्वज पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२० जून २००१ – १८ ऑगस्ट २००८
मागील मुहम्मद रफीक तातर
पुढील आसिफ अली झरदारी

पाकिस्तानचा राष्ट्रप्रमुख
कार्यकाळ
१२ ऑक्टोबर १९९९ – २८ नोव्हेंबर २००७
मागील नवाझ शरीफ (पंतप्रधान)
पुढील झफरुल्ला खान जमाली (पंतप्रधान)

पाकिस्तानचा लष्करप्रमुख
कार्यकाळ
६ ऑक्टोबर १९९८ – २१ नोव्हेंबर २००२
मागील जहांगिर करामत
पुढील अश्फाक परवेझ कयानी

जन्म ११ ऑगस्ट, १९४३
दिल्ली, ब्रिटिश भारत (आजचा भारत)
धर्म इस्लाम

बाह्य दुवे

आसिफ अली झरदारी

आसिफ अली झरदारी (उर्दू: آصف علی زرداری; सिंधी: آصف علي زرداري; जन्म: २६ जुलै १९५५) हा एक पाकिस्तानी राजकारणी व पाकिस्तानचा माजी राष्ट्राध्यक्ष आहे. २००८ ते २०१३ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर राहिलेला झरदारी हा लोकशाही मार्गाने निवडुन आलेला व ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारा पाकिस्तानचा पहिलाच राष्ट्राध्यक्ष आहे.

पाकिस्तानची दिवंगत पंतप्रधान व लोकप्रिय पुढारी बेनझीर भुट्टोचा पती असलेला झरदारी भुट्टोच्या मंत्रीमंडळामध्ये अनेक खात्यांवर होता. १९९६ साली झरदारीला भ्रष्टाचाराच्या आरोपावरून शिक्षा झाली. २००४ साली तुरूंगातून सुटल्यानंतर झरदारीने पुढील अनेक वर्षे दुबईमध्ये व्यतीत केली. डिसेंबर २००७ मधील बेनझीर भुट्टोच्या हत्येनंतर झरदारी पकिस्तानात परतला व त्याने पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेतृत्व हाती घेतले. सप्टेंबर २००८ मध्ये तो निवडणुकीमध्ये विजय मिळवून पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष बनला. आपल्या कार्यकाळादरम्यान झरदारीने अफगाणिस्तानात चालू असलेल्या युद्धामध्ये अमेरिकेसोबत सहकार्य केले तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानसाठी कोट्यावधी डॉलर्सचे कर्ज मिळवले.

ऑगस्ट ११

ऑगस्ट ११ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २२३ वा किंवा लीप वर्षात २२४ वा दिवस असतो.

कारगिल युद्ध

कारगिल युद्ध हे भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान सन १९९९ च्या उन्हाळ्यात लढले गेलेले मर्यादित युद्ध होते. या युद्धाची व्याप्ती भारताच्या कारगिल व आजूबाजूच्या परिसरापुरतीच मर्यादित राहिली, त्यामुळे याला मर्यादित युद्ध म्हणतात. तसेच या पूर्वीच्या भारत-पाक युद्धांप्रमाणेच याही युद्धात, युद्ध सुरू झाल्याची व संपल्याची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नव्हती. उलट पाकिस्तानतर्फे युद्धादरम्यान त्यांचा देश अलिप्त आहे असा कांगावा करण्यात आला होता. पुढे अनेक वर्षांनंतर हळूहळू पाकिस्तान सरकारने व अनेक लष्करी अधिकाऱ्यांनी हे युद्धच होते असे जाहीर केले.सन १९९९ च्या उन्हाळ्यात, पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले व या घुसखोरांना हुसकावण्यासाठी कारगिलचे युद्ध सुरू झाले. ही ठाणी कारगिल व द्रास परिसरातील अतिउंच दुर्गम जागी होती. अनेक महिन्यांच्या प्रयत्‍नांनंतर भारताला ही ठाणी परत मिळवण्यात यश मिळाले.

हे युद्ध आधुनिक इतिहासातील अतिउंचीवरच्या युद्धाचे अत्युत्‍कृष्ट उदाहरण आहे. यात युद्धाला लागणारी सामग्री व मनुष्यबळ ने-आण करण्याचा चांगलाच अनुभव भारतीय सैन्याला मिळाला. हे युद्ध दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज झाल्यानंतरचे पहिलेच युद्ध होते त्यामुळे सर्व जगाचे लक्ष या युद्धाकडे लागले होते. परंतु भारताने हे युद्ध कारगीलपुरतेच मर्यादित ठेवले. त्यामुळे दाखवलेल्या संयमाबद्दल भारताचे जगभर कौतुक झाले. म्हणूनच, भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळाला व याउलट, सैन्य मागे घ्यावे यासाठी पाकिस्तानवर अमेरिकेसह अनेक देशांनी दबाव आणला. या युद्धानंतर भारताने आपल्या संरक्षण खर्चात अनेक पटीने वाढ केली. तर पाकिस्तानात राजकीय अस्थिरता माजली. परिणामी, काही महिन्यांतच (ऑक्टोबर, इ.स. १९९९ मध्ये) पाकिस्तानात जनरल परवेझ मुशर्रफ यांनी नवाझ शरीफ यांचे सरकार उलथून लष्करशाही लागू केली. कारगिल युद्ध भारताने जिंकला .

जून २०

जून २० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १७१ वा किंवा लीप वर्षात १७२ वा दिवस असतो.

बेनझीर भुट्टो

बेनझीर भुट्टो (सिंधी: بينظير ڀٽو ; उर्दू: بینظیر بھٹو ; रोमन लिपी: Benazir Bhutto;) (जून २१, इ.स. १९५३ - डिसेंबर २७, इ.स. २००७) ही पाकिस्तानातील राजकारणी व माजी पंतप्रधान होती. ती पाकिस्तान पीपल्स पार्टी या डाव्या-मध्यममार्गी पक्षाची अध्यक्ष होती. एखाद्या मुस्लिम देशाच्या सर्वोच्च नेतृत्वपदापर्यंत पोचलेली ती पहिली महिला होती. इ.स. १९८८ - इ.स. १९९० व इ.स. १९९३ - इ.स. १९९६ या कालखंडांदरम्यान ती दोनदा पाकिस्तानाची पंतप्रधान होती.

तिचा पिता झुल्फिकार अली भुट्टो हा सुद्धा पाकिस्तानचे पंतप्रधान राहिला होता. ४ भावंडांमध्ये बेनझीर सर्वात मोठी होती. तिचा विवाह पाकिस्तानी उद्योगपती आसिफ अली झरदारी ह्यासोबत झाला. त्यांना दोनदा पाकिस्तानचे पंतप्रधान पद भुषवण्याची संधी मिळाली व दोन्ही वेळा त्यांचे सरकार नियोजित कालावधी पुर्ण करण्यापुर्वीच भ्रष्टाचारांच्या आरोपांवरुन राष्टृपतींद्वारा बरखास्त करण्यात आले. दुसऱ्यांदा सरकार बरखास्त करण्यात आल्यानंतर त्या अलिखित करार नुसार लंडन येथे निघुन गेल्या. कालांतराने २००७ साली त्यांनी पुन्हा पाकिस्तानात परतायचे प्रयत्न चालु केले. तत्कालिन राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी फारसी अनुकुलता दर्शविली नाही. तरीही त्या पाकिस्तानात परत आल्या. अखेर प्रचारसभेत झालेल्या बाँबस्फोटात त्यांची हत्या करण्यात आली. त्यामागचे नेमके सुत्रधार अजुन अंधारात आहेत.

युसफ रझा गिलानी

युसफ रझा गिलानी (देवनागरी लेखनभेद: युसूफ रझा गिलानी; उर्दू: مخدوم سیّد یوسف رضا گیلانی ; रोमन लिपी: Yousaf Raza Gillani ;) (जून ९, इ.स. १९५२ - हयात) हा पाकिस्तानातील राजकारणी असून २५ मार्च, इ.स. २००८ ते १९ जून, इ.स. २०१२ या कालखंडादरम्यान पाकिस्तानाचा १६ वा पंतप्रधान होता. पकिस्तानी अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांबद्दलच्या चौकशीचे न्यायालयीन आदेश डावलल्यामुळे न्यायालय-अवमानाच्या कारणावरून पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाने २६ एप्रिल, इ.स. २०१२ रोजी यास दोषी ठरवले व राष्ट्रीय विधिमंडळातील याचे सदस्यत्व अवैध ठरवले. विधिमंडळाचे सदस्यत्व गेल्यामुळे याला १९ जून, इ.स. २०१२ रोजी पंतप्रधानपद सोडावे लागले. सध्या हा पाकिस्तान पीपल्स पार्टीचा उपाध्यक्ष आहे. याआधी इ.स. १९९३ ते इ.स. १९९७ या कालखंडादरम्यान हा राष्ट्रीय विधिमंडळाचा सभापती होता.

शौकत अझीझ

शौकत अझीझ (उर्दू: شوکت عزیز ; रोमन लिपी: Shaukat Aziz) (६ मार्च, इ.स. १९४९ ; कराची, तत्कालीन पश्चिम पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानी अर्थशास्त्रज्ञ व राजकारणी आहे. याने जनरल परवेझ मुशर्रफ याच्या नेतृत्वाखालील संयुक्त लष्करी राजवटीत २० मे, इ.स. २००४ ते १५ नोव्हेंबर, इ.स. २००७ या कालखंडात पाकिस्तानाचा १५वा पंतप्रधान म्हणून सूत्रे सांभाळली. याने आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत देशाच्या अर्थव्यवस्थेची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी प्रयत्न केले व त्यात याला काही अंशी यशही आले. पंतप्रधानपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर हा लंडन, युनायटेड किंग्डम येथे स्थायिक झाला असून मिलेनियम अँड कॉप्थॉर्न पीएलसी या कंपनीच्या मंडळावर काम करत आहे.

राजकारणात प्रवेशण्याअगोदर अझीझ अमेरिकेत सिटीबँक समूहात वरिष्ठपदावर काम करत होता. परवेझ मुशर्रफ याच्या आमंत्रणावरून अमेरिकेतून पाकिस्तानात परतून नोव्हेंबर, इ.स. १९९९मध्ये याने पाकिस्तानाच्या अर्थमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली. ६ जून, इ.स. २००४ रोजी तत्कालीन पंतप्रधान झफरुल्लाखान जमाली याने पदाचा राजीनामा दिल्यामुळे पाकिस्तान मुस्लिम लीग (क्यू) या राजकीय आघाडीने शौकत अझीझ याचे नाव पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी पुढे केले. २८ ऑगस्ट, इ.स. २००४ रोजी त्याने पंतप्रधानपदाची शपथ घेतली व १५ नोव्हेंबर, इ.स. २००७ रोजी मुदत संपेपर्यंत पदाची धुरा वाहिली. कार्यकाळाची मुदत पूर्ण केलेला तो पहिला पाकिस्तानी पंतप्रधान ठरला.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.