एजियन समुद्र

एजियन समुद्र (ग्रीक: Αιγαίο Πέλαγος, एजेओ पेलागोस; तुर्की: Ege Denizi;) हा दक्षिण बाल्कन प्रदेश व अनातोलियाचे द्वीपकल्प यांच्यादरम्यान, म्हणजेच ग्रीस आणि तुर्कस्तान देशांच्या मुख्यभूदरम्यान पसरलेला भूमध्य समुद्राचा खाडीसदृश भाग आहे. हा उत्तरेस मार्माराचा समुद्रकाळा समुद्र यांना दार्दानेलियाबोस्फोरस सामुद्रधुन्यांनी जोडला आहे. या समुद्राच्या पाण्याचा रंग अतिशय गडद निळा असा आहे. त्यामुळे बेटांबरुन या समुद्राची दृश्ये अतिशय देखण्याजोगी आहेत.

Aegean Sea map
एजियन समुद्राचा नकाशा (इंग्लिश मजकूर)
अटलांटिक महासागर

अटलांटिक महासागर हा जगातील दुसरा मोठा जलपृष्ठाचा विभाग आहे. याचे एकूण क्षेत्रफळ साधारणतः १०६.४दशलक्ष वर्ग-कि.मी. आहे. ह्या महासागराने पृथ्वीवरील जवळ जवळ एक पंचमांश पृष्ठ व्यापले आहे. 'अटलांटिक' हे नाव ऍटलास या ग्रीक संकल्पनेवरून पडले. ऍटलासचा सागर तो अटलांटिक. या नावाचा उल्लेख सर्वप्रथम हेरोडोटस संस्कृतीच्या इतिहासात साधारण इ.पू.४५० च्या सुमारास आढळतो.

अटलांटिक महासागर इंग्रजी एस (S) आकारात असून, त्याच्या पश्चिमेला अमेरिका आणि पूर्वेला युरोप आणि आफ्रिका खंड आहेत. हा महासागर उत्तरेला आर्क्टिक महासागराला मिळतो, तर नैरृत्येला पॅसिफिक महासागर, आग्नेयेला हिंदी महासागर, आणि दक्षिणेला दक्षिणी महासागर/ दक्षिणी समुद्र यांना मिळतो. विषुववृत्त या महासागराला दक्षिण अटलांटिक महासागर आणि उत्तर अटलांटिक महासागर या दोन भागांमध्ये विभागते.

अनातोलिया

अनातोलिया (तुर्की: Anadolu ; ग्रीक: Ἀνατολή, आनातोली, अर्थ: सूर्योदय; इंग्रजी: Asia Minor, एशिया मायनर, अर्थ: छोटा आशिया ;) ही आशियाच्या सर्वाधिक पश्चिमेकडील भूप्रदेशासाठी वापरली जाणारी भौगोलिक व ऐतिहासिक संज्ञा आहे. अनातोलियाने तुर्कस्तानाच्या प्रजासत्ताकाचा मोठा हिस्सा व्यापला आहे. याच्या उत्तरेस काळा समुद्र, ईशान्येस जॉर्जिया, पूर्वेस आर्मेनियाचा डोंगराळ प्रदेश, आग्नेयेस मेसापोटेमिया, दक्षिणेस भूमध्य समुद्र, तर पश्चिमेस एजियन समुद्र आहेत. ऐतिहासिक काळापासून हिटाइट, ग्रीक, पर्शियन, असीरियन, आर्मेनियन, रोमन, बायझंटाइन, अनातोलियन सेल्जुक, ओस्मानी संस्कृती अनातोलियाच्या परिसरात नांदल्यामुळे अनातोलिया पुरातत्त्वशास्त्राच्या दृष्टीने जगातील सर्वांत संपन्न वारसा असणाऱ्या प्रदेशांपैकी एक आहे.

अलेक्झांडर द ग्रेट

महान अलेक्झांडर, अर्थात तिसरा अलेक्झांडर, मॅसेडोन (अन्य नावे: अलेक्झांडर द ग्रेट, सिकंदर ; ग्रीक: Μέγας Ἀλέξανδρος ; मेगास आलेक्सांद्रोस) (जुलै २०, इ.स.पू. ३५६ ते जून ११, इ.स.पू. ३२३) हा मॅसेडोनियाचा राज्यकर्ता होता. जागतिक इतिहासात तो सर्वांत यशस्वी व कुशल सेनापतींपैकी एक गणला जातो. तत्कालीन ग्रीक संस्कृतीला त्या काळात ज्ञात असलेले संपूर्ण जग त्याने जिंकले आणि त्यामुळे तो जगज्जेता म्हणूनही ओळखला जातो.

आपल्या कारकिर्दीत त्याने इराण, सीरिया, इजिप्त, मेसोपोटेमिया,फिनीशिया, जुदेआ, गाझा, बॅक्ट्रिया तसेच भारतातील पंजाबपर्यंतचा प्रदेश जिंकला. फारसी दस्त ऐवजांनुसार त्याला एस्कंदर-इ-मक्दुनी (मॅसेडोनियाचा अलेक्झांडर) म्हटले जाते. तर उर्दू आणि हिंदी दस्तऐवजांत त्याला सिकंदर-ए-आझम म्हटले गेले आहे.

प्लूटार्क आणि एरियन या प्राचीन ग्रीक इतिहासकारांनी लिहून ठेवलेला अलेक्झांडरचा समग्र इतिहास योग्य आणि खरा इतिहास म्हणून ग्राह्य धरला जातो. त्यापैकी 'अलेक्झांडरचे बालपण आणि तारुण्या'वर प्लूटार्कचा इतिहास अधिक समग्र आहे.

काळा समुद्र

काळा समुद्र (तुर्कस्तान: Karadeniz, कारादेनिझ ; ग्रीक: Μαύρη Θάλασσα ; रशियन: Чёрное море ; इंग्लिश: Black Sea, ब्लॅक सी ;) आग्नेय दिशा युरोपातील हा भूवेष्टित समुद्र आहे. या समुद्रास युरोप, अनातोलिया व कॉकेशसाने वेढले असून, भूमध्य समुद्र एजियन समुद्र व अनेक सामुद्रधुन्यांद्वारे अटलांटिक महासागराशी जोडला गेला आहे. तसेच, तो बोस्फोरस सामुद्रधुनीमार्फत मार्माराच्या समुद्राशी जोडला गेला आहे, तर डार्डेनेल्झची सामुद्रधुनी त्याला भूमध्य समुद्राच्या 'एजियन समुद्र' या उपसमुद्राशी जोडते. ही जलराशी पूर्व युरोप व पश्चिम आशिया यांना दुभागते. काळा समुद्र हा कर्चच्या सामुद्रधुनीद्वारे अझोवच्या समुद्राशीही जोडला गेला आहे. काळ्या समुद्राचे क्षेत्रफळ ४,३६,००० वर्ग कि.मी. (१६८,५०० वर्ग मैल) (अझोवाचा समुद्र वगळता), सर्वाधिक खोली २,२०६ मी. (७,२३८ फूट), आणि आकारमान ५४७,००० घन कि.मी. (१३१,२०० घन मैल) इतके आहे. बल्गेरिया, जॉर्जिया, रशिया, रोमेनिया, तुर्कस्तान आणि युक्रेन यांमध्ये तयार होणाऱ्या पूर्व पश्चिमोत्तर लंबवर्तुळाकार भूभागात काळा समुद्र तयार झालेला आहे.

याच्या दक्षिणेस पोंटिक पर्वतरांगा, तर पूर्वेस कॉकेसस पर्वतरांगा आहेत.या समुद्राची जलपृष्ठावरील पूर्व पश्चिम दिशेतील सर्वाधिक लांबी (पूर्व-पश्चिम) १,१७५ कि.मी. आहे.

इस्तंबुल हे तुर्कस्तानातील सर्वांत मोठे शहर याच समुद्राच्या काठावर वसलेले आहे. बातुमी, बुर्गास, कोन्स्टान्ट्सा, गिरेसुन, होपा, इस्तंबूल, कर्च, खेर्सन, मंगालिया, नावोदारी, नोवोरोस्सिक, ओदेसा, ओर्दू, पोटी, रिझे, सामसुन, सेव्हास्तोपोल, सोत्शी, सुखुमी, त्राब्झोन, व्हर्ना, याल्ता आणि झोगुल्डाक ही या समुद्राच्या काठाने वसलेली काही महत्त्वाची शहरे आहेत.

काळा समुद्र ही एक बाह्यप्रवाही जलराशी आहे; म्हणजेच, प्रत्येक वर्षी येऊन मिळणाऱ्या एकूण पाण्यापेक्षा साधारण ३०० घन कि.मी. इतके जास्त पाणी काळ्या समुद्रातून, बोस्फोरस आणि दार्दनेलस सामुद्रधुनींमार्गे, एजियन समुद्रात जाते.

भूमध्य समुद्रातून काळ्या समुद्रात येणारे पाणी हे "द्विस्तरीय जलप्रवाह प्रणाली" तयार करते. काळ्या समुद्रातून बाहेर पडणारे जास्त थंड आणि कमी खारट पाणी हे भूमध्य

समुद्रातून काळ्या समुद्रात येणाऱ्या पाण्याच्या वर तरंगत राहते, ज्यामुळे पाण्यात खोलवर ऑक्सिजन अभावित पाण्याचा स्तर तयार होतो. काळ्या समुद्राच्या उत्तरेकडील युरेशियाई जलप्रणालीतील नद्यांतूनही यात पाणी येते, ज्यातील डॉन, नीपर आणि डॅन्यूब या तीन महत्त्वाच्या नद्या आहेत.

भूतकाळात पृथ्वीवरील जलपातळी अनेक वेळा कमी जास्त झालेली आहे, की ज्यामुळे, तुलनेने कमी खोल असलेला काळ्या समुद्राचा तळ कधी काळी भूभागही होता. सध्याच्या काळात ही जलपातळी जास्त असल्यामुळे, सध्यातरी काळा समुद्र हा मुख्य सागरप्रणालीशी तुर्की सामुद्रधुनी तसेच भूमध्य समुद्रामार्गे जोडलेला आहे. जलपातळी कमी/जास्त होत असता, तुर्की सामुद्रधुन्या हा काळ्या समुद्राचा मुख्य जलनिचऱ्याचा मार्ग आहे. ज्या ज्या काळात काळ्या समुद्राला मुख्य सागर प्रणालीशी जोडणारे जलप्रवाह अस्तित्त्वात नसतात, त्या त्या वेळी, काळा समुद्र हा एक मोठे सरोवर असल्याप्रमाणे असतो. तुर्की सामुद्रधुनीत बोस्फोरस, मार्माराचा समुद्र आणि दार्दनेलस या जलराशींचा समवेश होतो.

तुर्कस्तान

तुर्कस्तान (तुर्की :Türkiye) किंवा टर्की हा मध्यपूर्वेतील एक मोठा देश आहे. हा देश दोन खंडामध्ये (युरोप व आशिया) विस्तारित आहे. अंकारा ही तुर्कस्तानची राजधानी आहे तर इस्तंबूल हे त्या देशातील सर्वात मोठे शहर आहे.

त्राक्या

त्राक्या (बल्गेरियन: Тракия, Trakiya, ग्रीक: Θράκη, Thráki, तुर्की: Trakya) हा आग्नेय युरोपामधील एक ऐतिहासिक भौगोलिक प्रदेश आहे. त्राक्याच्या उत्तरेला बाल्कन पर्वतरांग, दक्षिणेला एजियन समुद्र तर पूर्वेला काळा समुद्र व मार्माराचा समुद्र आहेत. सध्याच्या राजकीय सीमांनुसार त्राक्याचा बराचसा भाग बल्गेरिया देशात तर उर्वरित भाग तुर्कस्तान व ग्रीसमध्ये स्थित आहे. डॅन्यूब नदी त्राक्याची उत्तर सीमा ठरवण्यासाठी वपरली जाते.

इस्तंबूल, प्लॉव्हडिव्ह, बुर्गास, एदिर्ने, तेकिर्दा इत्यादी त्राक्यामधील मोठी शहरे आहेत.

पश्चिम आशिया

पश्चिम आशिया हा आशिया खंडामधील सर्वात पश्चिमेकडील भौगोलिक प्रदेश आहे. अनेकदा ह्या भागाचा उल्लेख करण्यासाठी मध्यपूर्व हे नाव देखील वापरले जाते. परंतु संयुक्त राष्ट्रे व इतर अनेक आंतरराष्ट्रीय संस्था पश्चिम आशिया हेच नाव वापरतात.

पश्चिम आशिया पूर्व युरोप प्रदेशाच्या दक्षिणेस स्थित असून तो एजियन समुद्र, काळा समुद्र, भूमध्य समुद्र, अरबी समुद्र, कॅस्पियन समुद्र, इराणचे आखात व लाल समुद्र ह्या सात समुद्रांनी वेढला गेला आहे. उत्तरेकडे हा प्रदेश युरोपापासून कॉकेसस पर्वताने वेगळा केला गेला आहे.

बाल्केसिर प्रांत

बाल्केसिर (तुर्की: Balıkesir ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या वायव्य भागातील एजियन समुद्र व मार्माराचा समुद्रकिनाऱ्यावर मार्मारा प्रदेशामध्ये वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ११.६ लाख आहे. बाल्केसिर ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.

बाल्केसिर प्रांत येथील ऑलिव्ह फळाच्या लागवडीसाठी व पर्यटनासाठी लोकप्रिय आहे.

भूमध्य समुद्र

भूमध्य समुद्र हा अटलांटिक महासागराचा एक भाग व पृथ्वीवरील एक प्रमुख समुद्र आहे. हा समुद्र चारही बाजूंनी जमिनीने वेढला गेला असून त्याच्या उत्तरेस युरोप व अनातोलिया तर दक्षिणेस आफ्रिका खंड आहेत. भूमध्य समुद्र पश्चिमेला जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीने अटलांटिक महासागरासोबत जोडला गेला आहे. डार्डेनेल्झ व बोस्फोरस ह्या सामुद्रधुन्या भूमध्य समुद्राला मार्माराच्या समुद्रासोबत व काळ्या समुद्रासोबत जोडतात. तसेच इजिप्तमधील सुएझ कालवा भूमध्य समुद्राला लाल समुद्रासोबत जोडतो.

तांत्रिक दृष्ट्या अटलांटिक महासागराचाच एक भाग असला तरी बरेचदा भूमध्य समुद्र एक वेगळा पाण्याचा साठा समजला जातो. २५ लाख चौरस किमी इतके पृष्ठभागाचे क्षेत्रफळ असलेल्या भूमध्य समुद्राची सरासरी खोली १,५०० मी तर कमाल खोली ५,२६७ मी इतकी आहे.

समुद्र

समुद्र हा पृथ्वीवरील खाऱ्या पाण्याचा मोठा साठा आहे.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.